भानावर या ! हैद्राबाद एनकौंटर आणि उन्मादी जनभावना

By  milind dhumale on 

पाच मिनिटात मॅॅगी सात मिनिटात फ्रँकी बनवून खाणाऱ्या फास्टफुडी जनरेशनला न्यायसुद्धा तसाच झटपट हवा आहे.इस्टंंट.नो लेट.पण थोडं भानावर येवूया बबली शोना जानू एवढं उन्मादी होऊ नका.आनंद नक्की साजरा करा.कारण त्यात मी विरजण घालू इच्छित नाही.शेवटी तुम्हालाही आपल्या भारतीय राज्यघटनेने ते स्वातंत्र्य दिलेलं आहे.

या लेखाने कदाचित तुम्ही मला शिव्याशाप द्याल.कारण वेगळी बाजू सांगणाऱ्या स्त्री पुरुषांना लोकांनी यातही स्त्री पुरुष दोघेही.यांनी प्रचंड शिव्या अन ट्रोल केले आहे.दु:खद हे की बलात्काराच्या मुद्यावर उन्माद करणारे हेच लोक वेगळी बाजू सांगणाऱ्या स्त्रियांवर बलात्कार झाला पाहिजे अशी भूमिका घेताना दिसले.अर्थातच स्त्री-पुरुष दोघेही असे बोलताना दिसले.खरंच हे लोक बलात्काराच्या निषेध करतात? खरंच यांना बलात्कार थांबवावा आरोपींना शिक्षा व्हावी असे वाटते? मग दुसऱ्यांवर देखिल बलात्कारच केला पाहिजे अशी मानसिकता कशीकाय निर्माण झाली? अन ती कशी पाहायची?

तेव्हा इथेही शांतपणे नीट समजूनउमजून न घेताच कुणीतरी माझ्या आई बहिणीविषयी वाईट उद्गार काढेल.त्यांच्यासोबत असं घडलं तर काय करशील असा रोकडा सवाल माझ्या पुढ्यात टाकाल.तुमचं हे सगळं मला मान्य आहे.पण कृपा करून मुद्दा नीट समजून घ्या.

समाजातील बुद्धीजीवी वर्ग जेव्हा भूमिका घेतात तेव्हा ती व्यापक असते.ती स्वहितासाठी नसते.हे समजून घ्या.तुम्ही सामान्य आहात तुम्ही चीड राग व्यक्त करणारा त्याला कसलाही विधिनिषेध नसणार हे ठीक आहे.परंतु बुद्धीजीवी वर्ग हा आपल्या मांडणीला मताला मोडीत काढतो अन समग्र समाजाच्या हिताची मागणी का करतो हे एकदा नीट समजून घ्या.

यासाठी हे सुरु करण्याअगोदर माझी एक पार्श्वभूमी तुम्ही जाणून घ्यावी अशी माझी विनंती आहे.मी एका माजी सैनिकाचा मुलगा आहे.ज्याने भारताच्या सीमेवर १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात कामगिरी बजावली आहे.आपल्याकडे सैनिक अन त्यांच्या मुलांना आदर देतात गुलमेहेर बिचारी अभागी दुर्दैवी ठरली म्हणा.तीला बलात्काराच्या धमक्यापर्यंत काहींची मजल गेलेली आठवलं.पण मला हे तुम्हाला सांगितलं पाहिजे,तुम्हाला माहिती असावं असं वाटलं म्हणून.

दुसरं माझे काही भाऊ चुलत वगैरे मुंबई पोलिस मध्ये आहेत.एक भाऊ वारला आता (त्याची पत्नी) वहिनी आहेत.सासरवाडी सासरे अन मेव्हुणे पोलिसात आहे.म्हणजे आमच्या परिवारातच सैनिक पोलीस यांची जास्त संख्या आहे.मी अशा परिवारातून येतो.हे व्यक्त होताना आपण लक्षात ठेवा.म्हणजे मी जी मते व्यक्त करणार आहे ती कोणताही पूर्वग्रह वा अभिनिवेश न बाळगता करणार आहे.

तर काही गोष्टी अगोदर स्पष्ट करूया -

बलात्कार आणि नंतर केलेला खून हा जबर शिक्षेस पात्र आहे.आरोपींना सोडा माफ करा शिक्षा करू नका असं कुणीही म्हणत नाही.म्हणलेलं नाही.म्हणूही नये.

अन अर्थात आता तर ते नाहीतच पण त्यांना किंवा अशांना याअर्थाने अतिशय कठोरात कठोरात शिक्षा व्हायला हवी.यासाठी आपण एक व्यवस्था स्विकारली आहे.आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहोत.असे आपण अभिमानाने म्हणत आलो आहोत.आपल्याकडे गुन्हे सिद्ध करायला एक व्यवस्था आहे.

ती कुणालाही आवडत नसली,पसंत नसली मान्य नसली तरी स्वीकारणेच हिताचे असते. कारण यातच सर्वांचे भले असते.तुम्ही म्हणता ते सौख्य सामावलेले आहे.तसं.

हैद्राबादच्या घटनेत दोन गट पडले.एक गट एनकाऊंंटर झाला त्यावर उन्माद करणारा अन दुसरा गट हे एनकाऊंंटर स्पष्टपणे मान्य नसणारा.या दोन्ही गटात समाजातील विशिष्ट अशी नाही तर प्रत्येक स्तरावरील लोकं होती.त्यामुळे या घटनेत तरी तुम्ही अमुक तमुक विचाराचे लोक असे वागतात असं म्हणू नाही शकत.ही वस्तुस्थिती आहे.

यात काहीसा अपवाद आहे आंबेडकरी गटाचा हा कमालीचा विवेकी वागताना दिसला.पण शंभर टक्के नाही हेही खरं कारण काहींनी या घटनेचे समर्थन देखिल केलेलं आहेच.

आता एक गोष्ट मात्र नीट लक्षात घ्या.या दोन गटात एनकाऊंंटरच्या विरोधातील गटात असणाऱ्या लोकांपैकी कुणीही आरोपींना शिक्षा करू नका असे म्हणलेलं नाही.आरोपींचा बचाव कुणीच केलेला नाही.

मुद्दा काय? तर कायदा कुचकामी ठरला आहे.इथली व्यवस्था कुचकामी ठरली आहे. न्यायालये कुचकामी ठरली आहेत.अन एकूणच म्हणून व्यवस्था नालायक म्हणून सगळंच मोडीत काढून आम्हाला आता झटपट न्याय हवा ही मानसिकता बळावली.

आता हे सगळं तुम्ही असं वागावं याचसाठी घडवून आणलेलं आहे.हे अगोदर लक्षात घ्या.ही व्यवस्था न्याय देवू शकत नाही असं तुम्हाला वाटायला लागणं हाच त्यांचा मूळ अजेंडा होता.अन त्यात ते सक्सेस झाले.

मी हैदराबाद पोलिसांनी काय केलं ? का केलं या तपशिलात जात नाही.पण काही बेसिक प्रश्न उपस्थितीत होतातच त्यांना टाळता येत नाही.

हैदराबाद पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी या चार आरोपींना भल्या पहाटे जागेची परेड आणि तीथे काही वस्तू ठेवलेल्या ते रिकव्हर करायला नेलेलं होतं.अन त्यादरम्यान आरोपींनी सहकार्य करण्यास नकार दिला.मग आरोपींनी पोलिसांचे पिस्तुल हिसकावले अन गोळीबार सुरु केला.आणि मग बचावासाठी आम्ही गोळीबार केला यात ते ठार झाले.

टिपिकल चित्रपटाला साजेशी स्टोरी आहे.असो.

आरोपीनी सहकार्य केलं नसतं तर पोलिसांना जागा अन वस्तूबद्दल माहिती कशीकाय मिळाली?

आरोपी चार होते,पोलिसांची संख्या दहा आहे असे सांगण्यात येतेय.

आरोपींचे हात बांधलेले नव्हते? आरोपींच्या हातात बेड्या का नव्हत्या?

बेड्या होत्या तर त्यातूनही त्यांनी पिस्तुल हिसकावून घेईपर्यत इतर पोलीस काय करत होते? पोलीस एवढे हलगर्जीपणा करत होते? एवढा सहजपणा होता?

पोलीस म्हणतात आम्हाला कुणालाही गोळी लागली नाही.फक्त दोन पोलीस जखमी आहेत.कशामुळे ते स्पष्ट करण्यात आले नाही.आरोपी शरीराने लहान दिसतात एकच त्यात निबर आहे.पोलीस दहा आहेत.चार आरोपींना दोन पोलीस पकडून ठेवू शकत होते.तरीही दोन पोलीस उरतात.

हे प्रश्न आहेत.अन याची उत्तरे पुढे मिळतील.पण मुद्दा इथून सुरु झालाय.अन हे सगळं ठरवून 6 डिसेंबर हाच दिवस निवडून केलं का? हाही एक मुद्दा अनेकांनी उपस्थित केला आहे.

आपण लोकशाही व्यवस्था अन कायद्याचं राज्य का स्विकारायचं ? का प्रक्रियेला महत्व द्यायचं हे समजून घेण्यासाठी मी खाली 5 उदाहरणे दिलेली आहेत.यात पोलिसांची भूमिका कशी होती ते नीट अभ्यासा.तुमच्या लक्षात येईल की कुणाला तरी जास्त अधिकार दिले.अंकुश नसेल आणि लोकशाही प्रक्रिया मान्य नसेल तर त्याचं काय होतं.

बघा ही उदाहरणे -

 

1 पुणे जिल्हा पिंपरी-चिंचवड

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड महापालिकेस पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्यास मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत बंद पाईपलाईनद्वारे पिंपरी-चिंचवडला पाणी देणारच असा पवित्रा घेतला होता.त्यामुळे शेतकरी चिडले होते.(संदर्भ दैनिक सामना 3 ऑक्टोबर 2018 2:48 pm)  त्यावेळी भारतीय किसान मोर्चातर्फे ९ ऑगस्ट २०११ रोजी काढलेल्या मोर्चात शिवसेना-भाजप आणि आरपीआय हे पक्ष सहभागी झाले होते. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर या मोर्चाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने १३ सप्टेंबर २०११ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांचा चौकशी आयोग स्थापन केला होता.पुणे जिल्ह्यातील पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यास विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेला गोळीबार समर्थनीय नव्हता, असे स्पष्ट करीत याप्रकरणी चौकशी आयोगाने तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्यासह चार पोलीस अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला.मात्र या चार अधिकाऱ्यांची केवळ विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेत सरकारने याही अहवालास केराची टोपली दाखविल्याचे समजते.(संदर्भ महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Apr 3, 2019, 01:16PM )

 

 

2 तामिळनाडू तूतीकोरिन

वेदांता कंपनीविरोधात तामिळनाडूत झालेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तसेच मारहाणीत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर सोमवारी अखेर तामिळनाडू सरकारने तुतिकोरिनच्या स्टरलाईट कंपनी कायमची बंद करण्याचे आदेश दिले आहेत.तुतिकोरिन आंदोलनात सहभागी लोकांवर पोलिसांनी गोळीबार केला, त्यांना मारहाणही केली. पोलीस आणि सरकार यंत्रणा वेदांता कंपनीच्या दबावाखाली आहेत, असा आरोप होतो आहे. म्हणूनच आंदोलकांवर अशी कारवाई करण्यात आली, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. (संदर्भ बीबीसी मराठी 29 मे 2018) त्यावेळी सोशल मिडियात खालील फोटो खूप वायरल झाला होता.

 

3 उत्तरप्रदेश लखनऊ 

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये दोन पोलिस कॉन्स्टेबलने ऍपल कंपनीच्या मॅनेजरची गोळी झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या मॅनेजर यांचं नाव विवेक तिवारी असून ते शुक्रवारी रात्री आयफोन लॉन्चिंगचा एक कार्यक्रम आटपून घरी जात असताना ही घटना घडली. शुक्रवारी रात्री विवेक तिवारी आयफोन लॉन्चिंगचा एक कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या गाडीनं घरी जात असताना पोलिसांनी त्यांना गाडी थांबण्याचा इशारा केला. त्यानंतर विवेक यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आणि हे प्रकरण वाढलं. प्रकरण वाढल्यानंर पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी आणि त्याच्या सहकाऱ्याने विवेक यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली. यानंतर विवेक यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद कुमार तिवारी यांनीही ही हत्याच असल्याचं म्हटलं आहे.'विवेक यांना गाडी थांबवण्याचा इशारा केल्यानंतरही त्यांनी गाडी थांबवली नाही, उटल माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला' त्यामुळं स्वत:चा बचाव करण्यासाठी मी त्यांच्यावर गोळी झाडली असं बनाव या पोलिस कॉन्स्टेबलनं केला आहे. असं असलं तरी घटनेतील पोलिस कॉन्स्टेबलला कलम ३०२ अधिनियम अंतर्गत अटक करण्यात आली असून या घटनेची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. (संदर्भ महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Sep 30, 2018, 09:04AM) पोस्ट मोर्टेम रिपोर्ट मध्ये डोक्याला गोळी लागून मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले.

 

 

4 सांगली अश्लिल सीडीचा धंदा करणा-यांनी पोलिसांना दिली अनिकेतची सुपारी सांगलीतील अनिकेत कोथळे प्रकरणातील वेगवेगळे ऍगल समोर येऊ लागले आहेत. अनिकेत ज्या दुकानात कामाला होता तेथे महिलांचे अश्लील चित्रीकरण करून सीडी बनविण्याचा गोरखधंदा सुरू होता. याची माहिती अनिकेतला मिळाल्यानेच संबंधित दुकानमालकाने तेथील स्थानिक पीएसआय युवराज कामटे याला सुपारी देऊन अनिकेतची हत्या घडवून आणल्याचे त्याच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सत्य लपविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येथील पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्यासह सर्व पोलिस अधिका-यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली आहे.(संदर्भ दैनिक दिव्यमराठी) अनिकेतला दोन हजार रूपयांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला उलटे टांगून पाण्याच्या बादलीत तोंड बुडवून मारले होते. पोलिसांनी अनिकेतवर थर्ड डिग्री वापरल्याने, त्यातच त्याचा मृत्यू झाला.अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी, पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने पहाटे 4 पर्यंत सांगली शहरात भटकंती केली.सांगलीपासून 150 किमी दूर असलेल्या सिंधुदुर्ग जिह्यातील आंबोलीमध्ये अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय कामटेच्या टीमने घेतला. आंबोली दरीतील फेकून दिलेला व अर्धवट जाळलेल्या अवस्थेतीत अनिकेतचा मृतदेह गुरुवारी बाहेर काढण्यात आला.

 

5 मुंबई घाटकोपर रमाबाई नगर  

रमाबाई नगरमध्ये 11 जुलै 1997 रोजी गोळीबार झाला होता. या घटनेत पोलिसांच्या गोळीबारात अकरा निष्पाप नागरिकांचा जागीच मृत्यू झाला होता. या गोळीबाराला राज्य राखीव दलाचा पोलीस फौजदार मनोहर कदम हा जबाबदार असल्याचं न्यायालयीन चौकशीत स्पष्ट झालं होतं.मात्र 22 वर्षे लोटली अजूनही न्याय मिळालेला नाही.मनोहर कदम आज आरामात आयुष्य जगत आहे.जे मृत्युमुखी पडले त्यांचे आयुष्य हकनाक संपलं.त्यांचे नातेवाईक मित्र यांच्यावर काय दु:ख कोसळलं असेल हे सांगता येणे अवघड आहे.

power comes with great responsibility असं एक छान वाक्य आहे. ज्यांना अधिकार असतात त्याना त्याहीपेक्षा जास्त जबाबदारी सुद्धा असते.हे लक्षात घ्या.

आता बघा वरील घटनेत आपलेच प्रियजन बळी गेले आहेत.तेही हकनाक बळी गेलेत.यात काही घटना या मासेसच्या आहेत तर काही वैयक्तिक स्तरावरील..यातील वैयक्तिक मध्ये विवेक तिवारी आणि अनिकेत कोथळे यांचे उदाहरण पाहा.

या जागी आपण स्वत: असू शकतो.किंवा आपले प्रियजन असू शकतात.समजा उद्या एका ग्रुपसोबत तुम्ही असाल अन त्यातील एकाने असेच अघोरी कृत्य केलं.परंतु आरोप तुम्हा सर्वांच्यावर लागला.तर तुम्हाला तुमची बाजू मांडण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे का?

यात तुमचा भाऊ असू शकतो वडील असू शकतात अगदी कुणीही असू शकतं त्यांचा काहीच गुन्हा नसताना जर त्यांना असेच झटपट संपवले जाणार असेल इस्टंंट  न्याय दिला जाणार असेल तर देशात काय होईल याचा आपण विचार केला आहे का?

पोलिसांनी त्यांच्या स्तरावर प्रश्न सोडवले तर काय होतं त्याची ही पाच उदाहरणे आहेत.कालच एक माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे म्हणाले की मुंबईतील 85%  एनकौंटर हे खोटे होते.हे धक्कादायक आहे.याचा तुम्ही विचार करणार आहात की नाही?

बघा तुम्हाला व्यवस्थेची चीड आहे.व्यवस्था कोण चालवत आहे? विचार करा.

तुम्हाला न्यायालयात चालणारे खटले ,तारीख पे तारीख याचा प्रचंड राग आहे. या न्यायालयीन व्यवस्थेत कोण कोण आहेत,कोण चालवतं याची माहिती घ्याल.न्यायाधीशांची संख्या अपुरी असेल,पोलिसांची संख्या अपुरी असेल.

जेव्हा काही न्यायाधीश मिडियासमोर येवून म्हणाले की न्यायव्यवस्था धोक्यात आहे तेव्हा आपण त्यांची खिल्ली उडवली ना? आपण त्यांच्यासोबत उभे राहिलो का?

हि व्यवस्था बदलण्यासाठी आपण काय पाऊले उचलली?

आपण सरकारला याबद्दल कधी जाब विचारला? आपण सुद्धा नागरिक म्हणून आपली कर्तव्य पार पाडली आहेत का? हाही एकदा विचार केला पाहिजे.बदल आपल्यापासून सुरु होतो.ही व्यवस्था आपली आहे.आपलं सुरक्षा कवच आहे.ती एकदा निघाली तर सत्ताधारी कुणीही असो ते तुम्हाला असेच पिसणार आहेत.हे थांबवायचं असेल तर भानावर येणे अन भान टिकवून ठेवणे आवश्यक आहे.कारण ही व्यवस्था तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहे.

डिपार्टमेंटशी अप्रत्यक्ष संबंधित असलो तरी माझा मुद्दा सर्वांच्या न्यायाचा भल्याचा अन लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठीचा कायम रहात आला आहे.पुढेही असेल.

म्हातारी मेल्याचे दु:ख म्हणून करू नये नाहीतर काळ सोकावेल.

भानावर येवूया.भानावर राहूया.

- मिलिंद धुमाळे