दोन वेळच्या भाकरीचा चंद्र त्यांनी कुठे शोधावा?

By  milind dhumale on 

दोन वेळच्या भाकरीचा चंद्र त्यांनी कुठे शोधावा?
नारायण सुर्वेंनी शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची व्यथा बरोबर मांडली आहे. चंद्र सूर्य चांदण्या सौंदर्याच प्रतिक असलं तरी गरीबांना तो चंद्र आपल्या ताटातल्या भाकरीतच दिसतो तेच त्याच आयुष्य असतं..

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले...
शेकडो वेळा चंद्र आला,तारे फुलले, रात्र धुंद झाली 
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली...

शेतकऱी आणि गरीब आदिवासींना पद्मश्री पुरस्कार दिलेल्या व्यक्तीं नंतर कशा जगतात हे याच ज्वलंत उदाहरण म्हणजे दैतारी नायक २०१९चे पद्मश्री विजेते..

मोठे मोठे पुरस्कार देण्यापेक्षा त्यांनी केलेल्या जगावेगळ्या कामाची पावती म्हणून यापुढेही आयुष्य सुकर जावे याची व्यवस्था करावी. सर्वोच्च नागरी सन्मानाने जगणं कठीण झाले दैतारी नायक यांच..


मोठ्या लोकांना जेव्हा पुरस्कार मिळतो त्यांना तो अभिमानाने मिरवता येतो कारण त्यांची गरज प्रसिद्धीची असते. सर्वसामान्य माणसाने असामान्य कामगिरी केल्यावरही त्यांच्यावर कुटूंबाच्या उदरनिर्वाहाची पण जबाबदारी असते. पुरस्कार मिळणाऱ्यांमध्ये पण अशी दरी असू नये सरकार ने ती दरी मिटवायला हवी तरच सर्वसामान्य माणसाच्या असामान्य कामगिरीला कर्तृत्वाला खरा सन्मान मिळेल..

"आदिवासी शेतकरी ७५ वर्षांच्या दैतारी नायक यांनी २०१० ते २०१३ या तीन वर्षांत गावानजीक एक डोंगर पोखरून सुमारे तीन किमी लांबीचा एक कालवा तयार केला आणि या कालव्याद्वारे आसपासची सुमारे १०० एकर जमीन सिंचनाखाली आणली.

केओनझार जिल्ह्यातील तालबैरणी गाव खनिजसंपन्न असले तरी गावात दशकानुदशके पाण्याची तीव्र टंचाई होती. या परिसराला पाण्यासाठी पावसाळ्याची प्रतिक्षा करावी लागे. हे प्रश्न लक्षात घेऊन दैतारी नायक यांनी आपल्या गावची जमीन सुपीक असावी या ध्यासातून तीन वर्षे अहोरात्र काम केले आणि कालवा खोदला.

दैतारी नायक यांच्या अविश्वसनीय कार्याने सर्वजण थक्क झाले होते. भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून गेल्या मार्चमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराने आपले व आपल्या कुटुंबाचे आयुष्य बदलेल असे दैतारी यांना वाटले होते. पण दुर्दैव असे की, पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या हाताला आता काम मिळणे बंद झाले. आणि काम नसल्याने किड्या-मुंग्यांची अंडी खाण्याची वेळ त्यांच्यावर आली.सरकारने आपल्याला पुरस्कार दिला खरा पण माझे इतके हाल वाईट आहेत की हा पुरस्कार विकण्याचे माझ्या मनात येत असल्याचे दैतारी सांगतात.

मला पद्मश्री पुरस्कार मिळाला पण त्याने मला गरीबीत ढकलले. पुरस्कार मिळण्यापूर्वी मी दैनंदिन रोजगारावर मजूर म्हणून काम करत होतो. पण लोक आता तुम्हाला प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने काम करणे योग्य दिसत नाही म्हणून कामच देण्याचे टाळतात असे दैतारी यांनी सांगितले.

जगण्याला आवश्यक असणारी रोजीरोटीच मिळत नसल्याने किड्यामुंग्यांची अंडी खाऊन जगत असल्याची खंत दैतारी बोलून दाखवतात.हाताला काहीच काम नसल्याने दैतारी सध्या तेंदूची पाने व आंब्याचे पापड विकण्याचे काम करतात.

त्यांना ७०० रुपयाची पेन्शनही आहे पण त्यातून कुटुंब चालवणे अशक्य झाले आहे. काही दिवसांपूर्वी दैतारी यांना इंदिरा आवास योजनेंतर्गत घर मिळाले होते पण ते अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे ते त्यांच्या पूर्वीच्या जीर्ण झोपडीत राहतात. धावदैतारी यांचा मुलगा आलेख मजूर म्हणून काम करतो.

आपल्या वडिलांचे कार्य तो वेगळ्या शब्दांत सांगतो. ओरिसात नव्या रस्त्यांच्या बांधणीमु‌ळे अनेक कालव्यांचे नुकसान झाले आहे आणि त्याने दुर्गम भागात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आपल्या लोकांना पिण्याचे पाणी व तेही शुद्ध मिळावे अशी माझ्या वडिलांची इच्छा आहे पण ती पूर्ण होऊ शकत नसल्याने ते चिंतेत आहे असे आलेख सांगतो.

दैतारी नायक यांची कैफियत ऐकल्यानंतर क्योएंझार जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्ह्याचे कलेक्टर आशीष ठाकरे यांनी दैतारी यांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे व त्यांनी पुरस्कार परत करू नये म्हणून विनंतीही करू असे सांगितले आहे."

मूळ बातमी.. वायर हिंदी

वरील बातमीने अनेक प्रश्न निर्माण केलेत. सरकार या गोरगरीब आदिवासींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याऐवजी थट्टा तर करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो.
असामान्य कामगिरी करणारे लोक प्रसिद्धीच्या झोतात तर आले पण जगण्याच्या लढाईच काय?

टीम जागल्यासाठी सुनिता बुरसे 

 

padmshri daitari rashtrapti kovind bjp india indigeneous.jpg