२६ जानेवारी, प्रजासत्ताकदिन आणि लोकांची मानसिकता!

By  Suhas More on 

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमीत्त काही राजकीय पक्ष आणि विविध मंडळं यानी कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसे फ्लेक्स, बॅनर ठिकठिकाणी लागलेले दिसतात.

प्रजासत्ताक दिन हा जात, पंथ, धर्म, भाषा यांना सामावून घेणारा राष्ट्रिय उत्सव आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेला महान ग्रंथ म्हणजेच 'भारतीय राज्यघटना' होय! भारताने राज्यघटना स्विकारली तो हा दिवस.

आपल्याकडे लोकांना अजूनही 'भारतीय राज्यघटना' आणि '२६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन' यांचे महत्व समजलेले नाही असेच दिसते. प्रजासत्ताक दिनी फक्त भारतीय राज्यघटनेचाच प्रचार आणि प्रसार व्हायला हवा. सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्माता म्हणून असेलेले महत्व प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहचले पाहीजे. परंतू असे होताना दिसत नाही. याला कारण लोकांची मानसिक गुलामी!

प्रजासत्ताक दिनानिमीत्त सत्यणारायनाची महापूजा, हळदी-कुंकू, भंडारा असले कार्यक्रम ठेवणारे मानसिक गुलामगीरीचे प्रतीक आहेत असेच समजायला हवे.

प्रजासत्ताक दिन अथवा भारतीय राज्यघटना यांचा आणि सत्यणारायनाचा काय संबंध? राज्यघटना स्विकारली त्या दिवशी भारतीय संसदेत सत्यणारायन किंवा हळदी कुंकू झाले होते अशी कुठे नोंद नाही. ज्यांच्यामुळे संविधान अस्तीत्वात आले त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला लाज वाटणारे लोक मग असे मानसिक गुलामगीरीचे प्रदर्शन मांडतात.

प्रजासत्ताक दिनानीमीत्त जर कुठे असे कार्यक्रम कोणी आयोजित केले असतील तर अशा कार्यक्रमामध्ये जाणे म्हणजे संविधान, प्रजासत्ताक दिन आणि डॉ. बाबासाहेब यांचा अपमान केल्यासारखेच होईल .

 

---सुहास मुकुंद मोरे ©