स्त्रीसन्मान राखणं खरी मर्दानगी! प्रा.डॉ.प्रतिभा जाधव

By  milind dhumale on 

हे लिहिताना धाडधाड करत विचारांचं वादळ मेंदूला धडका देतंय जणू! हे वादळ सहज शमणारं नाहीये. संताप, उद्वेग,भय,राग सारेच सोबतीने कल्लोळ माजवताय चित्तात! घटनाही तशीच घडलीय. डॉ.प्रियंका रेड्डी या उच्चशिक्षित, सुंदर,सुशील तरुणीचा अर्धवट जळीत देह माध्यमांत बघितला आणि थरकाप उडाला!

ही घटना ताजी असताना पुन्हा तसाच अर्धवट जळीत स्त्रीदेह त्याच परिसरात सापडला हे आणखी भयाण आणि काळजी,भीती निर्माण करणारं. एक ट्रक ड्रायव्हर आणि तिन क्लिनर अशा चौघांनी मद्यधुंद अवस्थेत प्रियंकावर बलात्कार तितक्याच अमानवीपणे पेट्रोल टाकून निर्जन ठिकाणी तिला जिवंत जाळले.

या सर्वात तिचा अपराध काय? आणि कोणता? मोठ्ठ प्रश्नचिन्ह आहे समोर. ही प्रश्नचिन्ह दिवसेंदिवस वाढू लागलीय, उत्तरं मिळत नाही. आणखी किती काळ अशा प्रियंका , रिंकू,अमृता, असिफा,अरूणा, श्रद्धा आणि कितीतरी मायबहिणी वासनेच्या बळी जाणार? मालकी हक्क गाजवण्याची, उपभोगण्याची, गृहीत धरण्याची 'वस्तू' म्हणून बाईकडे किती काळ बघणार?

ती एक व्यक्ती आहे,नकार देण्याचा, निर्णयाचा तिलाही अधिकार आहे हे इथल्या पुरुषी व्यवस्थेला कधी पचनी पडणार? हे प्रश्न किंवा हा लढा विशिष्ट पुरुषी वृत्तीविरुद्ध आहे, पुरुषांविरुद्ध नाही. ही वासनांध, अविचारी, निर्ढावलेली वृत्ती रिंकू पाटीलला भर वर्गात जाळते, अमृतास भर चौकात भोसकते, निरागस लक्ष्मीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकते, श्रद्धाला उध्वस्त करते, भोतमांगेच्या प्रियंकास आख्ख्या गावासमोर नागवं करत अमानवी अत्याचाराने संपवते. चिमुरड्या असिफाला मरणयातना देत तिचा जीव घेते. निर्भया, दामिनी, गुडीया अशी कितीतरी उदाहरणे आहेत अत्याचाराची.

अत्याचार होतच आहेत फक्त नाव बदलली कालानुरूप एवढाच फरक. वेदना तीच,यातना तीच, अश्रू तेच,हतबलता तीच. न्यायासाठी लढाही तोच आणि वाट्याला आलेला अन्यायही तोच. हा भारत कधी बदलणार? भारतात प्रत्येक 18 व्या मिनिटास एक बलात्कार होतोय हे वास्तव आहे. याचे सखोल अभ्यास करताना अनेक कारणे लक्षात येतात.

कुटुंब विभक्त झाले, जुनीजाणती माणसे दूर गेली आणि नितीमूल्यांचा संस्कार हरवला. तंत्रज्ञानाची क्रांती झाली, नको ते-नको त्या वयात कळू लागले, दिसू लागले. वासना जागृत झाल्या आणि विकृती जन्मास आली. स्त्रीभ्रूणहत्या मोठ्या प्रमाणात झाली, स्त्रियांचे घटते प्रमाण चिंताजनक आहे.

स्त्रीपुरुष गुणोत्तर बिघडले आणि नैसर्गिक समतोलही ढासळला. वासना शमवायला दीड महिन्याची चिमुरडीही चालते इथल्या विकृतांना. आता तर पुरुषच पुरुषांवर अनैसर्गिक बलात्कार करताहेत. मुंबईत 35 वर्षीय युवकावर मागील महिन्यात बलात्कार झालाय. अमुक गोष्ट केली, केलेल्या गुन्हयाच्या परिणामाचे भान नसलेला बेभान,मागास निरक्षर समूह इथे आहे.

शिक्षणाचा अभाव आहेच त्यापेक्षाही नैतिक साक्षरता आज अधिक गरजेची. 'भारत हा विकसनशील देश आहे.' हे बालपणापासून आजही पुस्तकात आपण वाचतो हे दुर्दैवी आहे. भारतातील पुरुषप्रधान संस्कृती ही स्त्रियांसाठी नेहमीच मारक ठरली आहे.

त्यात बाईला दुय्यम लेखलं जातं. जातधर्म कोणताही असो प्रत्येक समूहातील 'स्त्री' ही 'दलितच' असते. बालपणापासूनच घरात मुलगा-मुलगी भेद हे खेळणी-कपडे- वर्तन- कामे यातून जोरकसपणे मनावर बिंबवले जाते. हा ठसा अमीट असतो जो एखाद्या प्रियंकाचा जाळून कोळसा करतो.

बाईचा सन्मान-आदर राखणं, तिला एक व्यक्ती म्हणून स्वीकारणं ही खरी 'मर्दानगी'. त्यातही 'ती' कोणत्या समूहातून आलीय यावरून तिची योग्यता ठरवणारा एक मोठा 'भंपक-दांभिक' वर्ग येथे असतोच. जो वर्ग मंचावर म्हणतो की, 'सावित्री- जिजाऊ-अहिल्या' आज जन्मास आल्या पाहिजे पण आपल्या घरात नको तर शेजारच्या घरात.

हीच दुटप्पी, बेगडी माणसं निकोप समाजास अडसर ठरतात. स्त्री-पुरुषसमानता , सन्मानाचा मुलांवर संस्कार व्हावा म्हणजे कुणा मुलीला स्वसंरक्षणासाठी बॅगेत मिरचीपूड ,धारदार शस्त्र बाळगावे लागणार नाही. नजरेनेही कित्येक पाशवी बलात्कार होतात फक्त त्याचा बभ्रा होत नाही एवढेच. तिच्या तोकड्या कपड्यांपेक्षा त्याच्या नजरेत अधिक 'नागडेपण' असते कित्येकदा पण प्रत्येकवेळी तीच असते दोषी नखशिखांत कपड्यात असली तरीही!

आता फास गुन्हेगारांच्या गळ्याभोवती आवळला जावा ,न्यायावाचून तळमळत कितीतरी जीव गेले पण जलद गतीने न्याय देणारा निकाल या भारताने अजून पाहिला नाहीये. ह्या बलात्काराच्या खटल्यांमध्ये कठोर,शिक्षा झाली म्हणजे 'मागचे शहाणे होतील.'

इथे सततापिपासू लोभी रात्रीत अशक्य बाबी शक्य करतील पण सामान्य निर्दोष व्यक्तीस न्याय मिळवून देण्याची इच्छाशक्ती इथल्या मुर्दाड राज्यकर्त्यांत नाही. लोकशाहीचे खरे मारेकरी हेच आहेत. जातधर्म,सत्ता,पैसा, पत हे न्यायदानाचे निकष नको.

हे स्थित्यंतर महद कठीण आहे. जे आपल्या हाती आहे ते करू या. सारे प्रश्न 'माणसाने' निर्माण केलेत आणि 'माणूसच' ते सोडवू शकतो. आपल्या घरापासून करू या सुरुवात बदलाची. मुलीवर बंधनं लादतो तसे मुलांसाठीही नीतिनियम असावेत.

घरातल्या व्यवहारातूनच स्त्री सन्मानाचे बाळकडू मिळाले पाहिजे. निरीक्षण आणि अनुकरणातून जे संस्कार होतात ते आयुष्यभर टिकतात. आजही समाजात शोषित स्त्रीलाच अपराधी म्हणून संबोधलं जातं,तिची वेदना समजून घेतली जात नाही .आपण खेद-खंत व्यक्त करतो. हळहळतो, शिव्याशाप देतो पण बदलाची नांदी देत नाही, ती दिलीच पाहिजे नाहीतर ह्या भयंकराची आग तुमच्या घरापर्यंत केव्हा पोहचेल हे सांगता येणार नाही.

जिथे अत्याचार दिसेल तिथे पहिला विरोधी आवाज तुमचा असला पाहिजे म्हणजे त्या आवाजात अनेक समविचारी आवाज मिसळतील, जे कुणाच्यातरी 'पहिल्या' आवाजाची वाट बघत असतात. सारेच सोबत येणार नाहीत, काही विरोध करतील, खिल्ली उडवतील, नाकं मुरडतील, नावे ठेवतील पण तुम्ही मागे हटायचं नाही,खचायचं नाही. 'कुछ तो लोग कहेंगे ,लोगो का काम है कहना!' म्हणूनच युवा कवी वैभव गुप्ताच्या ओळी इथे मला लाखमोलाच्या वाटतात-


सब भूल जाओ कहनेवालो याद रखो |
ये आखरी गलती आपकी भी हो सकती है |
कल सडक पे बेसूद बहन या बेटी आपकी भी हो सकती है |
और इस एहसास से बढकर कोई दर्द नही हो सकता है |
जो नारी का अपमान करे वो मर्द नही हो सकता है! |
जब सजा मौत की लागू होगी सारे दोषी लडको पर
फिर कोई लडकी नही मिलेगी खुनसे लथपथ सडको पर |
तो आओ प्रण लो मेरे साथ और ये आवाहन करो |
अपनी मर्यादाओं को समझो नारी का सम्मान करो |
-----------------------

लेखन - प्रा.डॉ.प्रतिभा जाधव
(साहित्यिक,वक्ता,एकपात्री कलाकार)
लासलगाव(जि.नाशिक)