देशातील तरुणांमध्ये द्वेषपूर्ण भावना का पेटत आहे !!

By  DADARAO NANGARE on 

देशातील तरुणांमध्ये द्वेषपूर्ण भावना का पेटत आहे !!

परवा जमिया विद्यापीठाच्या आवारात एक तरुण मुलगा बंदूक घेऊन घुसतो आणि गोळीबार करतो , आणि आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांना विचारतो ज्यांना आझादी पाहिजे ही घ्या , व लगेच तो फायरिंग करतो ज्यात एक विद्यार्थी जखमी होती , पण हे सुरू असताना मात्र त्याच्या मागे उभी असलेली पोलीस शांतपणे सर्व तमाशा बघत असल्याचे दिसले. जर हे प्रकरण दिल्ली पोलिसांनी नीट हाताळले असते , तर दुसरी घटना शाहीन बागेतील कदाचित घडली नसती , कारण जिथे दिल्लीच्या शाहीन बागेत अजून एक माथेफिरू तरुण घुसून गोळीबार करतो आणि म्हणतो हिंदूंचे ऐकले नाही तर हेच होणार . याचा सरळ अर्थ असा होतो की तो उघड उघड आंदोलन करणाऱ्या समूहाला धमकी देत होता , जर आपण या दोन घटनेचा अर्थ लावून दिल्लीच्या एका सभेत अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासमोर जी घोषणा दिली , ज्यात तो म्हणतो " देश के गद्दारा को " मग समोरचे लोक प्रतिसाद देतात " गोळी मारो सालो को " म्हणजेच देशातील एक मंत्री लोकांसमोर काय आदर्श निर्माण करतो असा प्रश्न निर्माण होतो . तर दुसरीकडे प्रवेश वर्मा नामक खाजदर ?? हा समूहाला भीतीचे कारण दाखवून चुकीचे व द्वेषमूलक वातावरण निर्माण करत आहे , जे क्लेशदायक आणि चिंताजनक आहे , कारण भारतीय लोकशाहीत विरोधी मत व विचार मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला असता काही लोक तो नाकारून , हुकूमशाही पध्दतीने आपले मत व विचार लादण्याचा प्रयत्न करत आहे .

जर तरुणांच्या हाताला काम दिले नाही , आणि त्यांची ऊर्जा आणि क्रयशक्तीचा योग्य वापर व विनियोग केला नाही , तर ही तरुण पिढी धार्मिक आणि जातीय प्रभावाला बळी पडून टोकाचे पाऊल टाकत जाणार , कारण या दोन्ही घटनेचा आणि गोष्टींचा विचार केल्यास असा प्रश्न निर्माण होतो की आजचे तरुण एवढी टोकाची भूमिका घेत असतील तर हे सरकारचे अपयश आहे , कारण एखाद्या समाजाच्या बद्दल एवढा द्वेष आणि राग यांच्या मनात येतो कसा व हे विष कोण त्यांचा मेंदूत पेरत आहे , याचा विचार आणि अभ्यास होणे गरजेचे आहे , कारण यामुळे ही तरुण पिढी विध्वंसक आणि धोकादायक वळणावर जात आहे .

आज देशा समोर बेरोजगारी , शिक्षण , महागाई , शेती प्रश्न , ढासाळनारी अर्थ व्यवस्था , आर्थिक मंदी , आरोग्य , पायाभूत सुविधांचा अभाव , जातीय अत्याचार , धार्मिक ताण तणाव , महिलांवर होणारे अन्याय अत्याचार , वाढती गुन्हेगारी , भ्रष्टाचार , सार्वजनिक क्षेत्रात होणारे खाजगीकरण , वाढते कंत्राटीकरण , कामगारांचे प्रश्न , घसरत जाणारी GDP ( सकल राष्ट्रीय उत्पन्न ) , विद्यापीठात विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले आदी देशा समोरील प्रश्न आणि समस्या असताना , त्याची उकल आणि सोडवणूक करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे , परंतु ते होत नसल्याने लोक रस्त्यावर उतरून आपले प्रश्न मांडत आहे , परंतु सरकार मात्र भारतीय जनतेचे प्रश्न सोडवण्या ऐवजी व त्यांचे गैरसमज दूर करण्या ऐवजी , लोकांना त्यांचे स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी CAA , NRC आणि NPR च्या माध्यमातून कायदा आणल्याने सर्व सामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत , ज्या रूपांतर भीतीच्या वातावरण तयार झाले आहे .

म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी आणि आपला आवाज सरकारला सांगण्यासाठी आज देशातील विविध भागात लोक स्वतः रस्त्यावर उतरून या कायद्याच्या विरोधात बोलत आहे व त्यांनी आंदोलन सुरू केली आहेत , कारण देशातील प्रत्येक नागरिकांना आपले मौलिक आणि संवैधानिक अधिकार जपण्याचा व स्वतःला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा घटनेने कायदेशीर हक्क दिले आहेत , म्हणून त्याचा वापर करत आज लोक प्रदर्शन करत आहे , तर दुसरीकडे काही लोक धार्मिक संख्या बळाच्या आधारावर आणि जोरावर आम्ही बोलू तो कायदा आणि आम्ही सांगू तो नियम हे बिंबवण्याचे काम करत असल्याने समाजात धार्मिक तेढ व तणाव आणि विषमता निर्माण करत आहे . खरेतर यात मोठ्या प्रमाणात तरुण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरून आपला सहभाग नोंदवून निषेध व विरोध करत आहे , आणि आपला आवाज सनदशीर मार्गाने सरकार पर्यंत पोहचवत आहे , परंतु काही समाजकंटक , मूलगामी लोकं आणि आपली राजकीय पोळी भाजणारे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करून हिंसक वळण देत आहेत.

जर एखाद्या कायद्याच्या बाबत जनतेत गैरसमज व संभ्रम निर्माण झाला असेल तर सरकारने योग्य पावले उचलून ती दूर केली पाहिजे व जनतेला आश्वाशित केले पाहिजे , परंतु तसे न करता जर सत्ताधारी पक्षातील काही लोक व कट्टरपंथी लोक हे जेव्हा उघड उघड लोकांमध्ये देशभक्त आणि देशद्रोही अशी उभी फूट पाडून दरी निर्माण करतात , आणि संवादाची दारेच बंद करण्यात धन्यता मानतात . ज्यामुळे समाजातील एका समूहात द्वेषपूर्ण आणि विषारी पेरणी करून तरुण मुलामुलींचे माथे भडकावण्याचे काम सुरू आहे , पण हे करत असताना आपण काय साध्य करत आहोत याचा जराही विचार केला जात नाही , कारण इतिहासत डोकावले तर लक्षात येते की , नाजीवादमध्ये हिटलरने जर्मनीत ज्यू लोकांच्या विरोधात आणि मुसोलिनीने इटली अबीसींनीया लोकांवर खूप अन्याय अत्याचार करून , काही लोकांमध्ये राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीच्या नावाखाली भावनिक करून दुसऱ्या धर्मातील लोकांच्या बाबत इतके द्वेष आणि विष पेरले की , ज्यामुळे समाजात विषमतेचे प्रमाण वाढत गेले आणि ज्याचे रूपांतर नरसंहार मध्ये झाले आणि मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली म्हणून देश अनेक वर्षे मागे लोटला गेला हा इतिहास आहे .

असे असले तरी भारतीय लोकांमध्ये विविधता असल्याने लोकशाहीत विरोधात बोलणाऱ्या लोकांचे ऐकले जाते , आणि त्या विरोधी मताचा व विचारांचा आदर केला जातो ही शिकवण आणि मूल्य दिली आहेत , जी इथल्या लोकशाहीची ताकत आणि बलस्थान आहेत , परंतु काही लोक बहुमताच्या जोरावर आम्ही काहीही करू शकतो व आम्हाला कोणी अडवणार नाही अशी चुकीची धारणा झाल्याने काही तरुण आणि लोक चुकीची कृती करताना विचार करत नाही व टोकाचे पाऊल टाकतात , व त्याला खतपाणी घालण्याचे काम अप्रत्यक्षपणे सरकार व शासन व्यवस्था करत आहे , ज्यामुळे देशभरात याचे काय पडसाद उमटले जातील याचा विचार केला जात नाही , त्यामुळे समाजातील सामाजिक सलोखा आणि अखंडता , एकता आणि भाईचार , बंधुभाव , सामाजिक न्याय धोक्यात येत आहे , ज्याचा परिणाम म्हणून देशात सामाजिक भीषण परिस्थिती उद्भवू शकते व तरुण लोक अराजतेकडे जाऊ शकतात , म्हणून वेळीच याची गंभीर दखल समाज व सरकारने घेतली पाहिजे .

तसेच तरुण लोक आणि विद्यार्थी सध्या देशभरात जे वातावरण आहे त्याबद्दल आपला निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र जमत आहे , कारण देशभरात व जगभरात जमिया विद्यापीठ व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ विरोध नोंदवला जात आहे , त्यातच नागरिकत्व संशोधन विधायक आल्याने समाजात भीतीचे वातावरण तयार झाले आहे . यामध्ये प्रामुख्याने धार्मिक अल्पसंख्याक यांना निशाणा केला जात आहे , असे चित्र सर्व स्तरात दिसत आहे . कारण भारतीय संविधानमध्ये कुठेही धर्माच्या आधारावर नागरिकता दिली जावी असा कुठेही उल्लेख नाही , परंतु सध्याचे सरकार हे मुस्लिम समाज व हिंदू धर्मातील मागास जाती आणि भटक्या जमाती यांना CAA , NRC आणि NPR च्या माध्यमातून बाहेर काढणार आहे , असा संदेश गेल्याने भयभीत आहेत व भीतीदायक वातावरणमध्ये जगत आहे , कारण एकट्या आसाम सुरुवातीला 44 लाख लोक कागदपत्रे सादर करू शकले नाही म्हणून ते अपात्र झाले , यावर गदारोळ झाल्याने म्हणून पुन्हा कागदपत्रे छाननी प्रक्रिया राबवली , ज्यामध्ये 13 लाख हिंदू आणि 6 लाख मुस्लिम हे NRC प्रक्रियामुळे आपले नागरिकत्व सिद्ध करू शकले नाही व अपात्र झाले , यात गंभीर बाब म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती फाकरुद्दीन अली अहमद आणि काही सेना अधिकारी यांनाही आपली अपात्र ठरवण्यात आले . तर दुसरीकडे सरकार म्हणत आहे की , आम्ही कोणत्याही परिस्थितीत ह्या कायद्याची अंमलबजावणी करणार व माघार घेणार नाही , त्यामुळे सर्व सामान्य जनता अस्वस्थ झाली आहे , कारण जनतेने ज्या सरकारला निवडून दिले आहे , तेच सरकार जनतेला नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगत आहे , काय विरोधाभास आहे , म्हणून जनतेला प्रश्न पडला आहे की , सरकार आपला आवाज व मागण्या का मान्य करत नाही आणि त्यावर चर्चा व संवाद का करत नाही , असा प्रश्न तरुणांच्या व जनतेच्या माध्यमातून सरकारला विचाराला जात आहे .

आपला
सुनील शिरिषकर
पीएचडी संशोधक, टिस मुंबई .