भविष्यात बलात्कार घडू नयेत म्हणून !

By  milind dhumale on 

आपली मुलगी बहीण नात्यातील मुलगी स्त्री यांच्या सुरक्षिततेसाठी
दोन मिनिटे वेळ काढून शांतपणे वाचा.

आज हिंगणघाट मधिल पीडिता संपली.स्त्रियांवरील अत्याचार का थांबत नाहीत? यावर अनेक गोंडसपातळीवर चर्वितचर्चा घडवून आणल्या जातात.तो फक्त एक फार्स असतो.

महिलांवरील अत्याचार का थांबत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर आपणच आपल्याला विचारले पाहिजे.

कारण आपली सोयीस्कर भूमिका आपल्याकडील प्रसारमाध्यमांची सोयीस्कर भूमिका.एबीपीमाझाने हिंगणघाट लावून धरलं.अगदी पहिल्या दिवसापासून त्यानंतर औरंगाबाद सिल्लोड घडलं.

हिंदू-मातंग समाजातील 50 वर्षिय महिलेला बलात्कारास नकार दिला म्हणून पेटवून दिले गेले.हे कृत्य करणारा तथाकथित उच्चजातीय.स्पष्टच म्हणायचं तर हिंगणघाट मध्ये बळी गेलेल्या पिडीतेच्या समाजातील.इतर आणखी दोन प्रकरणे घडली पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय.एक तर आर्थिक राजधानी मुंबईतील आहे.

सगळीकडे महिला पिडीत आहे बळी गेलीय.परंतु चर्चा आपण भेदभाव करतच करतो.

म्हणजे महिला जीवानिशी गेल्या तरी त्यांना आपण दुय्यमच मानतो.आपल्यासाठी तीच्या मृत्यूचा फायदा कुठे कसा होईल याची तजवीज पाहतो.

एबीपीमाझाचे संपादक खांडेकर आहे.खांडेकर हा मनुवादी पत्रकारितेचा उत्तम चेहरा आहे.खांडेकर इतर समाजाला बदनाम करण्यासाठी हेतुपुरस्सर चर्चा घडवून आणतात. मात्र आपल्याच समाजातील दहशतवादी हिंसक तरुणांच्या कृत्यावर ब्र काढत नाहीत.चर्चा तर फार लांबची गोष्ट.

असा खांडेकर प्रत्येक मिडिया हाऊसमध्ये आहे.जो मनुवादी अजेंडा रेटत असतो.हिंगणघाटच्या घटनेत पिडीतेला न्याय मिळावा असे कुणालाही वाटत नाही.तसे वाटण्याचे काही कारण देखिल नाही.त्यांना फक्त दोन समाजात तेढ निर्माण होऊन समाजात कसा विस्कळीतपणा येईल हेच पाहायचे असते.तसे नसते तर त्यांनी दोन्ही अत्याचाराच्या घटनांचे समन्यायी वार्तांकन केले असते.

एबीपीमाझामध्ये स्त्रिया सुद्धा आहेत.अन त्या फक्त लालीपावडर लावून छान छान कसं दिसायचं अन समाजाची घडी कशी विस्कळीत होईल याचीच काळजी घेताना दिसतात,अरे महिला ना तुम्ही?

तुम्हाला इतर महिलांच्या न्यायासाठी झगडावेसे वाटत नाही? पुरुष तर हरामीच आहेत.पण तुम्ही? अन त्यात पत्रकारिता करताय ना?
आपल्या पोटापेक्षा आपला सन्मान एवढा कस्पटासमान आहे का?

सर्वच मिडियाहाऊसेसनी फक्त हिंगणघाट फोकस केले आहे.इथं जास्त भडका उडण्याचे चान्सेस दिसतात हे त्यांना माहिती आहे.इतर ठिकाणी पिडीत महिला मागासवर्गीय म्हणजे हिंदू मातंग असल्याने तिकडच्या बातम्या चालवून काही साध्य होणार नाही हे त्यांना माहिती आहे.माझ्या यादीतले विचारवंत पत्रकार सिनेसमीक्षक सुद्धा सोयीची भूमिका घेताना दिसतात.

हिंगणघाटच्या बातमीखाली अत्याचार करणाऱ्या नीच इसमाची जात अधोरेखित करून त्याला जाळण्याची अन हैदराबादसारखे एनकौंटर करण्याची भाषा बोलली जातेय.हे फक्त समाजातील घटक बोलतात असे नाही.तर जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले अन ज्यांच्यावर कायदे करण्याची ते राबवण्याची जबाबदारी असते असे नेते सुद्धा अशी भूमिका घेतात.तेव्हा आपण समाज म्हणून नेमकं आहे तरी काय असा प्रश्न पडतो.

कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही हैदराबादच्या प्रमाणे शिक्षा द्यायला हवी असे अकलेचे तारे तोडले आहेत.आपण किती नालायक आहोत हेच लोकप्रतिनिधी आपल्या वर्तनातून दाखवत असतात.

यासगळ्यात औरंगाबादच्या प्रकरणावर मात्र कुणीच बोलायला तयार नाही.ना जनतेतील घटक,जनता,ना निवडून दिलेले सोकॉल्ड लोकप्रतिनिधी.का?

गुन्हेगारांच्या अन पीडितांच्या जातीवरून आपण भूमिका घेणार काय? हा नेमका कसला समाज आपण घडवू पाहतोय?याचे धोके अन आजवर झालेलं नुकसान माहिती नाही का? नसेलच.नसता अशी भूमिका कुणी घेतली नसती.

माझी स्वत:ची वैयक्तिक प्रतिक्रिया सगळ्याच घटनांवर सारखीच आहे. या सर्वच नराधम पशूंना समाजात जरब बसेल अशी शिक्षा दिली गेली पाहिजे.अशा लोकांना अजिबात दयामया दाखवता कामानये.असे लोक समग्र समाजासाठी घातक असतात.यांना समाजात कोणत्याही प्रकारे स्थान देता कामा नये.

हा सगळा एक भाग आहे.आता यामागची एक मानसिकता लक्षात घेऊया.
अशा घटना का घडतात?

कारण आपल्या सर्वांचीच दुटप्पी भूमिका.
जेव्हा खैरलांजी घडली तेव्हाही हे आपल्या जातीशी धर्माशी निगडीत प्रकरण नाही म्हणून संबंधित नसणाऱ्या अनेकानी दुर्लक्षित केलं.साधं दु:ख व्यक्त करण्याची माणुसकी बाळगली नाही.स्थानिक महिलांनी स्वत:च्या डोळ्यासमोर अत्याचार होत असताना कशा टाळ्या पिटून उन्माद केला चीत्कारल्या हे मी अनेकदा लिहिलं आहे.

तर मुद्दा हा की या प्रकरणाचे काय झाले?
आरोपींना शिक्षा झाली नाही.साक्षीदार फुटले.गावातील एकही स्त्री साक्ष द्यायला स्वत:हून पुढे आली नाही.अर्थात त्याही अप्रत्यक्ष दोषी असल्याने साक्ष द्यायला येण्याचा प्रश्नच नव्हता.गावाला सामूहिकरीत्या दंड करण्याची मागणी होती,परंतु पुरोगामी राष्ट्रवादीने या गावाला थेट तंटामुक्त पुरस्कार देवून गौरव केला.कुणालाही धक्का बसला नाही.फक्त संबंधित पिडीत अन त्यांचा समाज हातपाय आपटत राहिला.

पण...हे सगळं एवढ्यावरच थांबतं का?

नाही.खैरलांजी असो दिल्ली निर्भया असो की कोपर्डी असो कश्मीर मधिल असिफा असो गुन्हेगारांना शिक्षा होत नाही..कुलदीप सेंगरवरचा गुन्हा सिद्ध होतो पण फाशी होत नाही.जन्मठेप दिली जाते.जीव वाचतो.तर चिन्मयानंदला जामीन मिळतो.आसाराम रामरहीम रामपाल अन इतरांना तर अटक करण्यासाठी संबंधित लोकांसोबत प्रशासनाला संघर्ष करावा लागतो.यात चिन्मयानंद सुटल्यानंतर त्याचे कालच जंगी स्वागत झाले.

निर्भायाच्या केसमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या नराधमांना त्यांचे सगळे सोपस्कार पार पाडले जात नाहीत तोपर्यंत फाशी देणे हे पाप आहे.असे न्यायालयाने मत मांडून खळबळ उडवून दिली आहे.

निकोप निरोगी सभ्य समाजासाठी हे धोकादायक असतं.या सगळ्या घटना समाजाच्या मनावर कुठेतरी बिंबवल्या जात असतात.पोलिस.कायदे मंडळ न्यायव्यवस्था सगळं नासलेलं असल्यामुळे न्याय मिळत नाही.अन गुन्हेगारांच्या मनात पक्के होते की शिक्षा होतच नाही.फारतर जन्मठेप.ती दहा वर्षे भोगून आपण पुन्हा सुटू शकतो.यासगळ्या गोष्टी समाज घटकांवर परिणाम करत जातात.

अन त्या फक्त शोषकच नाही तर शोषित घटकांच्या मनावरही बिंबत जातात.याने गुन्हा करण्याची बेदरकार वृत्ती वाढीस लागते.अन यातूनच या घटना थांबत नाहीत तर आणखी वाढत जातात.हे सगळं रोखायचं असेल आपली आई बहिण मुलगी नात्यातील स्त्रिया मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर अगोदर आपण आपली मानसिकता बदलणे नितांत गरजेचे आहे.

गुन्हा घडला,पिडीत कोणत्या समाजाची आहे बघू नका.आरोपी आपल्या समाजाच्या आहे म्हणून भूमिका घेण्याचे टाळू नका.आरोपींसाठी मोर्चे काढून पाठिंबा देवू नका.कारण तुम्ही तुमचा एक आरोपी वाचवत असता परंतु त्याच्या अन तुमच्या कृत्याने समाजात दहा आरोपी तुम्हीच अशाप्रकारे जन्माला घालत असता.

म्हणून आपण म्हणतो म्हातारी मेल्याचे दुख करू नये काळ सोकावतो!

तसा हा काळ केव्हाच सोकावला आहे.आता फक्त आपल्याला आहे ते वाचवायचे आहे.बघा जमलं तर...!

 

- मिलिंद धुमाळे