आपण कुठे कमी पडलो?

By  Nitin Divekar on 

कांचीपुरमची बी. रोजा आणि हैदराबादची प्रियांका रेड्डी या दोघींचे जळालेले मृतदेह पाहिल्यानंतर मनात राग, हळहळ, भीती वगैरे भावना थोड्यावेळ निर्माण झाल्या पण रात्री झोप मात्र लागली. या घटना आता ईतक्या अंगळवणी पडू लागल्या आहेत की या घटना घडल्या नंतर आता माझी वगैरे उडत नाही. या निमित्ताने एक समाज म्हणून आपण कुठे निघालो आहोत हा महत्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. हिंस्त्र, असुरक्षित टोळी जीवन सोडून मानवाला आता हजारो वर्षे झाले आहेत. आपण गाव, नगर, शहर वसवली, पिरॅमिड्स, अजिंठा, ताजमहाल निर्माण केले, आपण चंद्रावर पाऊल ठेवलं, मंगळावर यान उतरवलं तरी आपण एक सभ्य माणूस आणि सभ्य समाज घडवण्यात कमी पडलो आहोत हे स्पष्ट आहे.

खैरलांजी घडलं तेव्हाच्या अल्लड वयात त्या घटनेचं गांभीर्य मला फारस समजलं नव्हतं. सम्राट वाचू लागलो आणि घटनेचं गांभीर्य समजत गेलं. त्यानंतर मी खऱ्या अर्थाने हादरलो होतो ते कोपर्डी प्रकरणाने. स्वतःच्या घरातून नजरेच्या टप्प्यात असलेल्या आजीच्या घराकडे जायला निघालेली शाळकरी मुलगी आजीच्या घरी पोहोचतच नाही आणि काही वेळातच तिचा मृतदेह सापडतो या घटनेने मी एक बाप म्हणून हादरून गेलो होतो. बी. रोजा आणि प्रियांका रेड्डीच्या बाबतीत तेच घडलं. घरातून कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुली घरी पोहोचल्याच नाहीत. या दोन्ही मुलींच्या कुटुंबियांना जे दुःख, ज्या मानसिक यातना झाल्या असतील त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. कोपर्डी घडलं तेव्हा माझी मुलगी ५ वर्षाची होती. तीची आई तिला शाळेत घेऊन जायची, घेऊन यायची तरीही काही दिवस भीतीत गेले. आजही मुलीला एकट बाहेर खेळायला सुद्धा जाऊ द्यावस वाटत नाही. हे जग मुलींसाठी एवढं असुरक्षित का झालय ते समजण्यासाठी स्वतःपासून सुरवात करावी लागेल.

फक्त आपल्याच घरातील स्त्रिया सुरक्षित राहिल्या पाहिजेत, मान-सन्मान फक्त आपल्याच घरातील स्त्रियांना असतो ईतर स्त्रियांना तो नसतो अश्या प्रकारच्या समजुतीत समाजातला एक मोठा वर्ग जगत आहे. हा वर्ग सगळ्याच जाती धर्मात आहे. ईतर स्त्रियांविषयी प्रचंड शाब्दिक, मानसिक हिंसा करणारा, त्यांना मनोरंजनाचं साधन समजणारा, एक भोगवस्तू समजणारा हा वर्ग या हिंसेच्या मुळाशी आहे. शाळा, कॉलेज मधून काहीही संस्कार केले तरी आपल्या घरात आपण मुलांवर काय संस्कार करतो हे फार महत्वाच आहे.

अगदी प्राचीन काळापासुन स्त्रियांकडे कुटुंबाच्या, जातीच्या, धर्माच्या ईज्जत वगैरेंच्या नजरेतून पाहण्यात येत आहे. एखाद्या कुटुंबाला, जातीला, धर्माला अपमानीत करण्याच्या हेतूने त्या कुटुंबातील स्त्रियांवर अत्याचार केला गेला. जिंकलेले सैन्याने पराभुतांच्या स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करणे ही कधीकाळी सामान्य बाब होती. अगदी अलीकडे जपानी सैन्याने चीनी महिलांसोबत, अमेरिकन सैन्याने व्हिएतनामी महिलांसोबत, आयसीस ने कुर्द आणि याझीदी स्त्रियांसोबत तेच केलं. भारताची फाळणी, नामांतर दंगलीत मराठवाड्यात आणि गुजरात दंगलीत तेच झालं. काश्मीर, आसाम मधे तैनात असणाऱ्या भारतीय सैन्यावर सुद्धा स्थानिक स्त्रियांवर अत्याचार केल्याचे आरोप अधूनमधून होत असतात आणि त्या विरोधात तिथे निदर्शने सुद्धा होत असतात. स्त्री शरीराच्या काही भागांना ईज्जत वगैरे चिकटवल्या गेल्यामुळे आणि स्त्री शरीरावर मालकी गाजवणे म्हणजे पुरुषार्थ वगैरे ठरवणाऱ्या भ्रामक विचारांनी, नितीमत्तेच्या अभावाने मानव समाजात फारच मोठा घोळ घातला आहे.

या घटना घडत राहतील. आपण प्रक्षोभ व्यक्त करत राहू. न्यायालय त्यांचं काम करत राहिल. आरोपीना शिक्षा होत राहील मात्र या घटना तोपर्यंत थांबणार नाही जो पर्यंत आपण केवळ आपल्याच घरातील स्त्रियांपुरता विचार करत राहू, जो पर्यंत आपल्या मनात, भाषेत, शब्दात, नजरेत असणारी लैंगिक हिंसा कमी होणार नाही तोपर्यंत असे प्रकार घडतच राहणार आहेत.

लोकशाहीच्या पूर्व अटी या आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कायदा हा तेव्हाच उपयोगाचा असतो जेव्हा त्याला मानण्याची, त्याचे पालन करण्याची नैतिकता असणारे लोक समाजात बहुसंख्यने असतील. लोकांमध्ये ती नैतिकता नसेल तर कायदा उपयोगाचा नाही.

कायद्याचा धाक ही दुसरी बाब आहे. काही अरब देशात बलात्कारी गुन्हेगाराला दिवसा ढवळ्या भर चौकात फाशी दिली जाते पण तरीही तिथे गुन्हे घडतात त्यामुळे कायद्याचा धाक जितका महत्वाचा आहे तेवढच एक नीतिमान समाज घडवणे सुद्धा आवश्यक आहे नाहीतर कायद्याच्या धाकाचा अभाव असलेल्या अनितीमान समाजात बी. रोजा, प्रियांका, निर्भयांचे बळी जातच राहतील आणि आपण फक्त निषेधाचे मोर्चे आणि कँडलमार्च पुरतेच मर्यादित राहू.