Letter to Mr.Rahul Gandhi , MP, INC

By  ANAND SHITOLE on 

श्री.राहुल गांधी, कॉंग्रेस खासदार.

सप्रेम नमस्कार ,

आपणास सल्ला द्यावा इतका वकूब आहे कि नाही हे माहिती नसतानाही सल्ला देतोय.

राजकारणात सातत्य हि महत्वाची गोष्ट असते आणि राजकारण हि वर्षाचे ३६५ दिवस २४ तास करण्याची गोष्ट आहे.राजकारणात आलेल अपयश आपल्याकडे सहानुभूती निर्माण करायला वापरतो तो कुशल राजकारणी, राजकारणात आलेली संकट संधीत रुपांतर करतो तो कुशल राजकारणी आणि राजकारणात कुठल्या घटनेची संधी होऊ शकते याच योग्य वेळेला आकलन होत तो कुशल राजकारणी.नजीकच्या काळात शरद पवारांनी इडीची नोटीस आणि पाऊस या दोन्ही बाबीत आणि संपूर्ण विधानसभा निवडणुकीत हे दाखवून दिलेलं. तुमचे पणजोबा, आजी आणि वडील यांनी याच लढवय्या वृत्तीच प्रदर्शन केलेलं आणि वडिलांच्या हत्येनंतर तुमच्या आईने तीच लढाऊ वृत्ती दाखवलेली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात जेव्हा तुम्ही “ चौकीदार ... “ घोषणा देत असत आणि त्याला लोकांचा प्रतिसाद मिळे त्यावेळी तुमच्याप्रमाणे आम्हालाही आशा वाटलेली.अपयश आलेल असल तरीही आमच्यासारखे सामान्य भारतीय पुन्हा संघाच्या विरोधात लढायला उभे राहिलेले आहेत.

तुम्हाला निराशा आलेली असली तरीही सध्याची स्थिती एक मोठ आंदोलन आणि सरकारविरोधी चळवळ उभारायला पोषक आहे.लोक उस्फुर्तपणे आंदोलनात सहभागी होत असताना मोठ्या विरोधी पक्षाच वरच्या फळीतल नेतृत्व कुठे आहे ? शाहीन बाग किंवा जामिया मधल्या मुलांना भेटून पाठींबा देणे हे प्रियांका गांधीनी केलेलं असल तरीही रस्त्यावर उतरून देशव्यापी आंदोलन उभारायला, आक्रमकपणे सरकारला भिडायला उच्चस्तरीय नेतृत्व का कच खातय ? साहजिकच वरच्या फळीतल सिंदिया,पायलट यांच्या सारखे आक्रमक नेते थंड आहेत.

हि काळाने तुम्हाला दिलेली मोठी संधी आहे जिथे कॉंग्रेस देशभरात आंदोलनात व्यापक पातळीवर उतरली आणि नागरिकत्व कायद्याच्या विरोधातला सरकारी प्रचार खोडून काढत आक्रमक झाली तर लोकांचा पाठींबा मोठ्या प्रमाणावर मिळवता येईल हे तुमच्या भवताली असलेल्या लोकांना समजत नाहीये का ?

प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राजकीय पटलावर पुन्हा स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी कॉंग्रेस का गमवत आहे ?

शीर्ष नेतृत्व थंड पडलेलं असल्याने साहजिकच राज्यातले सरदार ,दरकदार थंड पडलेले आहेत. विधानसभा निवडणुकीत बिळात लपून बसलेले सत्तेची चाहूल लागताच लोण्यासाठी भांडणारे बोकेही लाजतील अशी भांडण करायला लागले हे लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्राने बघितलेली आहे.

जर शीर्ष नेतृत्व मैदानात उतरून दोन हात करायला सरसावल तर देशभरात सगळ्या कॉंग्रेसच्या जुन्या खोडांना बुड हलवावी लागतीलच पण जी तरुणाई मोठ्या अपेक्षेने मध्यममार्गी नेतृत्वाची आणि राजकीय पर्यायाची अपेक्षा करते आहे तिला नेतृत्व मिळेल.राजकीय पटलावर फारशी सक्रीय नसलेली मंडळी या आंदोलनात पुढे आलेली आहेत.अशावेळी कॉंग्रेस मागे राहणे अनाकलनीय आहे.

कॉंग्रेसने हि संधी गमवली तर नुकसान फक्त पक्षाचे नसेल तर संपूर्ण भारताचे नुकसान असेल.सरकारच्या विरोधातल्या आक्रोशाला जर नेतृत्व मिळाल नाही आणि आंदोलन अपयशी ठरल तर समाजाला येणार नैराश्य पिढीला मातीत मिळवणार असेल.

श्री.राहुल गांधी, या आक्रोशातून लोक कंटाळून २०२४ ला कॉंग्रेसला निवडून देतील या भ्रमात कुणीही राहू नये. “ जिंदा कौम पाच साल इंतजार नही कर सकती “ लोकांनी तुम्हाला २०२४ ला का निवडून द्याव हे लोकांना पटवून सांगायला तुम्हाला आज रस्त्यावर उतरून हि लढाई मैदानात लढावी लागेल.अन्यथा हा पराभव फक्त पक्षाचा नसेल तर तो आयडिया ऑफ इंडिया चा पराभव असेल.