काका पुतण्या आणि बरचं काही.

By  Nitin Divekar on 

शनिवारी सकाळी लवकर ऑफिसला जायच असल्याने लवकर उठून ८:३८ ची ट्रेन पकडली. दरम्यान पहाटे महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ तो पर्यंत माहीत नव्हती. सवयीनुसार मोबाईल मधे लोकसत्ता ओपन केला. पहिलीच बातमी बघून हसू आलं. पण सरकार स्थापनेस होणाऱ्या दिरंगाईला वैतागून लोकसत्ताने लोकांची फिरकी घेतली की काय अस वाटलं. शिवाय अशी फिरकी घ्यायला आज काही एप्रिल फुलचा दिवस नव्हता की होळी नव्हती. युट्युबवर एबीपी माझा सुरू केला. तिथे सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि अजितदादा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याची बातमी. या बातमीच्या धक्क्यातून बाहेर यायला मला ५ सेकंदाचा वेळ लागला.

राष्ट्रवादीचा मागील काही वर्षांचा प्रवास पाहता भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन करणे ही बाब धक्कादायक नसून ती या दोन पक्षांच्या परस्पर सोयीच्या राजकारणाची नैसर्गिक परिणीती आहे हे लक्षात येईल. २०१४ला न मागता भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीने २०१९साली भाजप सोबत येऊन सत्ता स्थापन करण्यात आश्चर्य कसलं? तीन तलाक, ३७० प्रकरणी सभागृहात या विधेयकांच्या विरोधात मतदान न करता करता भाजपच्या सोयीची सभागृहातुन पलायन करण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली. शरद पवारांचे मोदी आणि गडकरींच्यासोबत असलेले मधुर संबंध सर्वश्रुत आहेत. शरद पवारांवर ईडीची चौकशी आणि नंतर माघार घेऊन भाजपने राष्ट्रवादीला मदत केली. पवारांचे प्रतिमावर्धन झाले. लोकांची सहानुभूती मिळाली. सिंचन घोटाळा प्रकरणात भाजपने काहीही एक्शन घेतली नाही.

विधानसभेच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे उमेदवार पाडावेत म्हणून राष्ट्रवादीला मदत केली. भाजपला राज्यात शिवसेना नको कारण सेनेच हिंदुत्वाच राजकारण भाजपला प्रतिस्पर्धा करत आणि भाजपला हिंदुत्वाच्या बाबतीत कोणीही प्रतिस्पर्धी नको आहे. शिवसेनेची स्पेस भरून काढण्यासाठी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस हा योग्य पर्याय वाटतो कारण राष्ट्रवादी पुरोगामी पक्ष आहे असा महाराष्ट्राचा गैरसमज आहे. राष्ट्रवादी ब्रह्मणविरोधी आहे पण पुरोगामी मात्र नक्कीच नाही पण सत्तेसाठी प्रसंगी ब्राह्मणवाद्यांसोबत तो सहज जाऊ शकतो. म्हनूनच विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला मोठं करण्यात हातभार लावत आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मदत करत आहे.

आज भाजपसोबत जाण्याबाबत शरद पवार व अजितदादा पवार या काका पुतण्यात वाद असल्याचे जरी दाखवले जात असले तरीही भाजप सोबत जाण्याचा निर्णय काका पूतण्यांनी एकत्रितपणे घेतला आहे. अजित पवार भाजप सोबत जाणार आणि काका शरद पवार त्याला विरोध करणार हे ठरऊन केलेल नाट्य. आता अजित पवारांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी आणि आम्ही अजूनही शिवसेने सोबत आहोत असे भासवण्याची कवायत म्हणजे केवळ शरद पवार यांची गेलेली पत राखण्याचा प्रयत्न आहे. शरद पवार त्यांच्या बेभरोश्याच्या राजकारणासाठी अख्या देशात ओळखले जातात. पुलोद सरकार स्थापनेसाठी त्यांनी वसंतदादा पाटलांना केलेला दगाफटका असो, सोनिया गांधींच्या राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधे फूट पाडणे असो किंवा २०१४साली महाराष्ट्रात भाजपला न मागता पाठिंबा देणे असो शरद पवार यांनी नेहमीच असे बेभरोश्याचे राजकारण केले आहे.

काल रात्रीपर्यंत शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेले असताना अजित पवार थेट भाजप मधे का गेले असतील हा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे? भाजपने अजितदादांना अस काय आमिष दाखवलं असेल? ईडीची भीती दाखवली की ईतर काही आमिष दाखवलं हे कळायला मार्ग नाही. मात्र काहीतरी फार मोठी देवाणघेवाण आणि मोठी आश्वासन दिली गेली आहेत हे निश्चित. सत्तेच्या घोडाबाजारात भाजपने थेट राष्ट्रवादीचा वजीरच विकत घेतला किंकाय अशी शंका मनात येते.
अजिददादांना सत्ता तर शिवसेना-काँग्रेससोबत जाऊन सुद्धा मिळणार होती मग त्याऐवजी थेट भाजपसोबत अजितदादा जातात आणि त्याबाबत शरद पवार पूर्णपणे अंधारात असतात यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. उडणाऱ्या पाखरांचे पंख मोजणाऱ्या शरद पवारांना आपला पुतण्या काय खिचडी शिजवतोय याचा थांगपत्ता नसावा यावर विश्वास कसा ठेवायचा? की शरद पवार स्वतः ही सत्तेची खिचडी शिजवण्यात सहभाही आहेत? काँग्रेस नेत्यांना या खिचडीची थोडीफार भनक नक्कीच लागली असावी आणि म्हणूनच काँग्रेस अगदी शांतपणे पावले उचलत होती.

१५ नोव्हेंबरच्या सकाळी रोजी शोध पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विटनुसार मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेला दुरावा दूर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका बड्या उद्योजकाने शरद पवारांसोबत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत सुरू केले होते आणि त्याचा महाराष्ट्रातील संभाव्य राजकीय समिकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवसात शरद पवारांची मोदी व नितीन गडकरींसोबत भेट झाली हे विसरता कामा नये. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते संपर्कात होते. राष्ट्रवादी एकीकसे शिवसेना आणि काँग्रेससोबत आहे असे दाखवत असताना अजितदादा दुसरीकडे फडणविस आणि अमित शहासोबत वाटाघाटी करण्यात गुंतले होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यावर जवळपास एकमत झाले होते. दुसऱ्या दिवशी सेनेतर्फे खुद्द उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी परिस्थिती असताना रात्री अजितदादा आणि अमितशहाने चक्रे उलटी फिरवली. राजकारणाचे हजार कान आणि हजार डोळे असणाऱ्या पवारांना याची कानोकान खबर नसावी हे अशक्य आहे.

पवारांनी अजितदादांना भाजपकडे का पाठवले असावे याबाबाय बिविध शक्यता आहेत. राज्यात जरी शिवसेना राष्ट्रवादी सत्तेत आली असती तरी केंद्रात मात्र भाजप सरकार आहे आणि भाजपकडे सरकारी तपास यंत्रणा आहेत. भाजप जर पी.चिदंबरम या दिग्गज काँग्रेस नेत्याला तुरुंगात टाकू शकते तर ती शरद पवार किंवा अजित पवारांना सुद्धा तुरुंगात टाकू शकते ही बाब शरद पवार ओळखून आहेत. आता वयाच्या या टप्प्यावर ईडी चौकशी, अटक वगैरेला सामोर जाणे शरद पवारांना मान्य नाही. शिवाय पुतण्याची सत्ताकांक्षा फार काळ रोखून धरणे सुद्धा शक्य नाही. त्यामुळे भाजपच्या सोयीने आणि पुतण्याच्या सोयीचे राजकारण करणे हा मार्ग शरद पवारांकडे उरतो. पण ही दोन्ही ध्येय साध्य करताना स्वतःची प्रतिष्ठा जपण्याची काळजी सुद्धा पवारांना घ्यावी लागत आहे. आता अजितदादांची पक्ष्याच्या विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी आणि उद्धव ठाकरेंसोबत प्रेस कॉन्फरन्स त्याच प्रयत्नाचा भाग आहे.

शरद पवारांनी पुतण्याला भाजपकडे पाठण्याचं दुसर महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी हे केवळ सत्तातुरांच सिंडिकेट आहे. या सिंडिकेटच अर्थकारण सत्तेशीवाय पूर्ण होऊच शकत नाही. या सिंडिकेटला कोणतीही नीतिमत्ता नाही. केवळ सत्ता मिळवणे हेच या सिंडिकेटच एकमेव ध्येय आहे. मागील ५ वर्ष सत्तेवीना काढल्या नंतर पुढील आणखी ५ वर्षे सत्तेवीना काढणे या सिंडिकेट मधील अनेकांना अशक्य झाल्याने त्यांनी भाजपची वाट धरली. सत्तेशीवाय हे सिंडिकेट फा रकाळ टिकू शकत नाही त्यामुळे कोणालाही सोबत घेऊन सत्ता मिळवणे हेच राष्ट्रवादी नामे सिंडिकेटची अपरिहार्यता आहे. शिवसेनेसोबत जाऊन भाजपला दुखावण्यापेक्षा भाजपसोबत जाऊन सत्ता व प्रोटेक्शन दोन्ही मिळतील हे लक्षात घेऊनच पवारांनी पुतण्याला भाजपकडे पाठवले आणि दुसरीकडे पुतण्याने फसवले असा बनाव रचला आहे. म्हणजे एकीकडे घरात सत्ता आणि दुसरीकडे पवारांना जनतेची सहनुभूती सुद्धा. वृद्धापकाळात पुतण्याने पाठीत वार केल्यानंतरही हार न मानता भाजप विरोधात लढणारा Maratha strong Man वगैरे इमेज सुद्धा तयार केली जाणार. उद्या येणार सरकार कोसळल तरी मिळालेल्या सहानुभूतीमुळे राष्ट्रवादीला फायदा होणार. चुकलेला पुतण्या पुन्हा काकाकडे येणार. पण जर भाजप आणि अजितदादा यांचे सरकार आले तरी घरचा मामला.

अजित पवार काकावर नाराज आहेत अश्या बातम्या मागील काही दिवसांपासून चर्चिल्या जात होत्या. पवार कुटुंब मोठं आहे. त्यातील काही जण राजकारणात आहेत. कोणी एग्रो बिजनेस तर कोणी वाइन इंडस्ट्री मधे आहे. पवारांचे सगेसोयरे सुद्धा तेवढेच मातब्बर उदा. पवारांची दुसरी पिढी राजाकरणात स्थिरावली आणि तिसरी पिढी सुद्धा राजकारणात उतरली. पवारांचा राजकीय वारस सुप्रिया सुळे की अजित पवार हा वाद नेहमीच समोर येत असतो. सुप्रिया सुळेंना दिल्ली तर अजित पवारांना महाराष्ट्राची सुभेदारी अशी वाटणी करण्यात आलेली आहे. रोहित पवार हे दिवंगत आप्पासाहेब पवार नातू. आप्पासाहेब शरद पवारांचे मोठे बंधू तर अजित दादा हे शरद पवारांचे दोन नंबरचे बंधू दिवंगत अनंतराव पवार यांचे पुत्र. कुटुंब वाढलं तस पक्षात सत्तेसाठीचा संघर्ष वाढणे साहजिक आहे. सत्तेची वाटणी केल्या शिवाय किंवा कोणाचा तरी राजकीय बळी दिक्याशिवाय हा सत्तासंघर्ष थांबणे शक्य नाही. वयोमानापरत्वे आता शरद पवारांनी बाजूला होऊन अजित दादांकडे पक्षाची धुरा सोपवावी अशी अजितदादा समर्थकांची इछा आहे तर फटकळ अजितदादा पक्षप्रमुख झाल्यास त्यांच्या मनमानीला सहन करावं लागेल अशी भीती शरद पवार समर्थकांना वाटते. दुसरीकडे शरद पवारांची लेक म्हणून सुप्रिया सुळे काहींना पक्ष प्रमुखपदी हव्या आहेत पण राष्ट्रवादी सारख्या सरंजामी पक्षात स्त्रीनेतृत्व कितपत स्वीकारलं जाईल हा एक मोठा प्रश्न आहे. शरद पवारांनी टाकलेला हा डाव यशवी झाला तर अजितदादांचं राजकीय करियर स्वतंत्रपणे सुरू होईल. महाराष्ट्राला दुसरी मनसे मिळेल. पवार कुटुंबातील सत्तासंघर्ष सुद्धा शांत होईल आणि भविष्यात पवार कुटुंबांतर्गत काही युत्या आघाड्या सुद्धा करता येतील. हे सगळं काका पुतण्याने एकमेकांच्या संगनमताने केले यात वाद नाही. राज्यातील राजकीय पेचप्रसंगाचा उपयोग स्वतःच्या घरातील सत्तासंघर्ष टाळण्यासाठी शरद पवारांनी करून घेतला यात वाद नाही. पण यात अजित पवार शेवटी बळीचा बकरा बनतात का ते पाहावं लागेल.

शरद पवारांनी टाकलेला हा डाव यशस्वी होतो का ते येत्या काही दिवसात कळेलच. पण मला या निमित्ताने काँग्रेस सोबत युती करण्यास तयार असणारे परंतु राष्ट्रवादीसोबत युती करण्यास नकार देणारे एड.प्रकाश आंबेडकर आठवतात. राष्ट्रवादी हा बिनबुडाचा पक्ष आहे, ते सत्तेसाठी कोणत्याही पक्षासोबत जाऊन शकतात असे त्यांनी केलेले विधान आठवले आणि काही विकले गेलेले स्वकीय दलाल सुद्धा आठवले. उडत्या पाखरांचे पंख मोजणाऱ्या शरद पवारांचे पंख एड.प्रकाश आंबेडकरांनी नेमके मोजले.