खरंच जगाला बुध्दांचा उपयोग नाही.?

By  Rakesh Adhangle on 

भारतीय संविधान सुपूर्द करताना २५ नोव्हेंबर १९४९ रोजी बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान सभेत लोकशाहीविषयी भाषण करतात तेव्हा ते काही सूचक इशारेही देतात व तेव्हा भारताचा लोकशाहीशी संबंध कधीपासून आहे हे सांगण्यासाठी ते थेट अडीच हजार वर्षापूर्वीचे उदाहरण देतात, ते म्हणतात "भारताला लोकशाही माहिती नाही असे नाही, एक काळ असा होता कि भारत हा गणराज्यांनी गच्च भरलेला होता आणि जेथे कोठे राजेशाही असेलच तर ती एकतर निवडलेली किंवा सीमित असायची. भारताला संसद किंवा संसदीय प्रणाली माहिती नाही असे नाही बौद्ध भिख्खू संघाच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते कि बुध्द काळात संसद होती. बौद्ध भिख्खू संघ म्हणजेच संसद होय." मध्ययुगीन काळाच्या उत्तरार्धात सरंजामशाही नष्ट होऊन कल्याणकारी व्यवस्था म्हणजेच लोकशाही आहे असे जगात अधिकृतरित्या मान्य केले गेले. पण भारताला पूर्वीपासूनच अर्थातच बुध्दाच्या काळापासूनच लोकशाही अवगत होती हे वरील उदाहरणातून कळून येईल.

बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सम्राट अशोकाचा काळ येतो तो भारताला एक मोठ्या उंचीकडे घेऊन जाणारा ठरला. सम्राट अशोकाचा साम्राज्यविस्तार हा ग्रीकपर्यंत पोहोचला होता. हा भारतीय सम्राटाचा सर्वात मोठा साम्राज्य ठरला. सम्राट अशोकाच्या बाबतीत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "गणतंत्रीय राज्यपध्दती ही बौद्ध काळाचीच देणगी आहे तथागत बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर इ.पु.२७४ पर्यंत बौद्धधर्माची स्थिती कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नाहीत तथापि अशोकाच्या काळात बौद्धधर्माचा प्रसार विजेच्या गतीने झाला. अशोक आणि चंद्रगुप्तासारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळातच झाले आहेत व यांनीच भारता बाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध स्थापित केले होते बौद्ध काळात भारता मध्ये स्थापत्यकला, चित्रकला, मुर्तीकला,इत्यादी नानाप्रकारच्या कलाचा विकास झाला बौद्ध काळात साहित्य आणि तत्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशातील विद्यार्थी येथील नालंदा व तक्षशीला विश्वविदयालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले त्यापूर्वी कधीही असा गौरव भारताच प्राप्त झाला नाही." जगभरातील मोठेमोठे विद्वान ग्रेट नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत असत. असा वैभवप्राप्त भारताला त्यानंतर कधीही झाला नाही आणि मला अभिमानाने सांगायला आवडेल कि तो बौद्ध काळ होता.

विषयतावादी, वर्चस्ववादी, वर्णवादी विचारसरणीचे तथा व्यवस्थेचे पुरस्कर्ते भारताच्या परभवाला अहिंसेला कारणीभूत ठरवतात. सम्राट अशोक व मोर्य सम्राटांचे परकीय आक्रमणासमोर पतन कधीही झाले नाही याउलट साम्राज्यविस्तारापुढे त्यांनी तेथे मैत्रीही प्रस्थापित केलेली होती. म्हणून सरंक्षण होत नव्हते असे नव्हे, सरंक्षणही चोखपणे होत असे. पण अशोकाच्या महाकाय साम्राज्यापुढे कुणीही तग धरू शकत नव्हते. नंतर शेवटी मोर्य साम्राज्याचा शेवटचा सम्राट बृहद्रथाची हत्या ही त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग कपटी ब्राम्हणाने केली होती. त्याकाळात कोणत्याही परकीय आक्रमणाने पराभूत व्हावे लागले नाही परंतु मोर्य राजाश्रय गमावल्यानंतर मनुस्मृती तयार झाली आणि त्यापुढे भारताची पराभवाची मालिका चालू होते त्याला कारण वर्णावर आधारित संधी देणे हेच होय. त्याकाळी केवळ क्षत्रिय हेच लढाई साठी मैदानात उतरू शकत होते. बाकीच्या वर्गाला मनुस्मृतीने ठरविल्याप्रमाणेच कामकाज करावे लागत होते.

यावरून आता बौद्ध काळ आणि बौध्दानंतर राजाश्रयात आलेला ब्राम्हणीकाळ यांच्यातील फरक असा स्पष्ट होतो कि बौद्ध काळ हा ब्राम्हणी व्यवस्थेपेक्षा श्रेष्ठ ठरतो. ही मळमळ या वर्चस्ववादी ब्राम्हणी विचारसरणीतील लोकांना कशी सहन होणार ?? म्हणून यांची किड ही नेहमीच व्यक्त होत आली आहे. म्हणून दंगलखोर लोक असली बालीश वक्तव्य करित आहे. पण बुध्द आणि बुध्दाची व्यापकता असल्या नासक्याना कळणार नाही. कारण बुध्द विवेक सांगतो, विचार स्वातंत्र्य देतो, समतेची मांडणी करतो, मैत्री शिकवतो, करुणा करतो आणि हो सर्वात महत्त्वाचे बुध्द दुखमुक्ती सांगतो. सुखी जीवन जगण्यासाठी बुध्दाचे तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ ठरले आहे. बुध्द ईश्वर, चमत्कार, आत्मा यांच्या अस्तित्वाला नकारतो. तो बुध्द हा मानवाला केंद्रबिंदू मानून मानवाच्या कल्याणाकारिता धम्म सांगतो. तो बुध्द या विषमतावादी, वर्णवादी, जातीयवादी, रुढीवाथी, पोथीवादी, ब्राम्हणवादी दंगलखोराना कसा काय आवडणार??

आपले उभे आयुष्य विज्ञानासाठी खर्च करणारा, विज्ञाननिष्ठ जीवन जगणारा जगप्रसिध्द थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन स्टाईन त्याच्या शेवटच्या पत्रात धर्माविषयी म्हणतो "मानवाच्या भविष्याचा धर्म हा विश्वव्यापी धर्म राहणार आहे. त्यामुळे माणसाच्या वैयक्तिक ईश्वर मागे पडून आणि धार्मिक कट्टरता तसेच धर्म शास्त्र या गोष्टी मागे पडतील. तो धर्म भौतीक आणि आध्यात्मिक या दोन्ही विषयाना व्यापले आणि तो धार्मिक दृष्टीने भौतीक आणि आध्यात्मिक बाबींचे ऎक्य निर्माण करणारा अर्थपुर्ण असेल. बुध्द धम्म हाच वरील कसोटयांना पूर्णपणे उतरतो आणि जर कोणता धर्म आधुनिक विज्ञानाच्या कल्पनेशी सुसंगत असेल तर मी तसा तर मी बुध्द धम्मच होय. खरे तर मी धार्मिक व्यक्ती नाहीय.परंतु जर मी तसा झालो तर मी बौध्दच होईल !"

या जगात जेवढी बौद्ध राष्ट्र आहेत त्यांची प्रगती तिथल्या नागरिकांचे जीवनमान आणि Happiness Index पाहिला तर आपल्याला वस्तुस्थिती समजेल कि बौद्ध राष्ट्रे ही किती प्रगतशील आणि सुखी आणि समृद्ध आहेत. बुद्धांचा जगाला काय उपयोग आहे हे यातून स्पष्ट होतं. जेव्हा बौद्ध राष्ट्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या थायलंडचा विषय येते तेव्हा तेथील अनेक विचारवंत म्हणतात की "बौद्ध धर्माने देशाला वसाहतवाद आणि गेल्या तीनशे वर्षांच्या अनेक विध्वंसक युद्धांपासून वाचवले आहे". नकाशावरुन जपानचे मापन केल्यास तो खूपच छोटासा देश दिसून येईल. पण त्याचा जागतिक पातळीवरील प्रभाव कौतुकास्पद आहे. कारण दुसऱ्या महायुद्धात उध्वस्त झालेला जपान इतक्या शक्तिशाली रुपात पुन्हां उभा राहिला हे अविश्वासनीय नव्हे तर आश्चर्यकारकच सुद्धा आहे. जगभरातील आर्थिक परिस्थितीतही चीन आणि जपान हे बौद्धराष्ट्र अग्रस्थानी आहेत, अनुक्रमे २ आणि ३ नंबरला आहेत. तर भूतानही आजघडीला आर्थिक सक्षमतेकडे वेगाने जाणारा देश आहे.

९ नोव्हेंबर १९३० रोजी महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो "आधुनिक वैज्ञानिक गरजांना सामोरे जाण्यासाठी कोणता धर्म असेल तर तो बौद्ध धर्म असेल." बुध्दाचा धम्म आजही तितका गरजेचा आहे जितका २५०० वर्षापूर्वी होता. धम्मात आत्मा, कर्मकांड, ईश्वर व मिथ्थ्यादृष्टीना स्थान नाही, स्वर्ग- ?नरक नाही कारण बौद्ध धम्म हा विज्ञानवादी आहे, भविष्यातही तो असाच गरजेचा असेल. एकमेकांना जगाच्या नकाशातून नष्ट करू पाहणाऱ्या या मानवी दृष्टनीतीचा उपचार बुध्दविचाराशिवाय, बुध्दाच्या धम्माशिवा कोणताही विचार देत नाही, म्हणून जो पर्यंत मानववस्ती जगात असेल तो पर्यंत बुध्द नेहमी मनुष्यांच्या मनात कायम वसलेला असेल. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात "बौद्ध धम्मानेच जगाचा उध्दार होणार आहे." म्हणून जगाला युध्द नव्हे तर बुध्दच हवा !

- राकेश अढांगळे