प्रियांका ते प्रियांका....

By  Mayur Lankeshwar on 

बलात्काराचं मूळ इथली नासलेली धार्मिक जातीय वर्गीय वर्चस्वाची पितृसत्ताक संस्कृती आहे. जिचा भारतीय संस्कृती म्हणून जगात डंका पिटला जातो. गुन्हेगारांचे लिंग कापणे, भर चौकात फाशी, स्त्रियांना बंदुका देणे हे सर्व वरवरचे फांद्यावर फवारणी करणारे उपाय. इथं मूळच सडलेलं आहे. झाड आतून किडलेलं आहे. सिव्हिलाइझ्ड संस्कृती म्हणून जे काही मानवी मूल्यांचे निकष असतात त्यातले एकही मूल्य ह्या संस्कृतीत टिकणारे नाही. तरीही बहुतांश भारतीयांना ह्या संस्कृतीचा अभिमान आहे. त्याचा गवगवा करणाऱ्यांत पुरुष आहेत आणि पुरुषांच्या दबावाखाली अनुकरण करणाऱ्या स्त्रियाही आहेत. ह्या विखारी पुरुषीपणाची भारतीय समाजाला लागलेली अंतर्बाह्य किड हे बलात्काराचे मूळ आहे. आपण सातत्याने मुळांवर घाव घालणाऱ्या उपायांबद्दल बोललं पाहिजे.

'निर्भया' घडलं तेव्हा दिल्लीचा जगभरात रेप कॅपिटल म्हणून हिडीस चेहरा समोर आला. दिल्लीच नाही तर आपल्या भारतातील प्रत्येक शहरं, प्रत्येक गावं, खेडी, वस्त्या ह्या रेप कॅपिटल चे केंद्रस्थान बनू शकतात इतका पितृसत्ताक विखार इथल्या वातावरणात ठासून भरलेला आहे. दिल्लीला रेप कॅपिटल म्हटलं गेलं तेव्हा माझा बरीच वर्षे ओळखीचा असणारा भारतीय मित्र मला म्हणाला होता कि विदेशी लोकं भारताची बदनामी करायला अश्या संज्ञा वापरतात, त्याच्या जोडीने एक मुलगीही होती, तिचंही आकलन तसंच होतं. त्या दोघांना भारतीय संस्कृतीमध्ये असणाऱ्या प्रतिकात्मक थोरपणाचे कौतुक होते. स्त्रियांचे कपडे, कुटुंबातील पुरुषांचे स्थान, भारतीय कुटुंबव्यवस्थेतील स्त्रीचा रोल, स्त्रीचे 'शालीन' असणे आणि पुरुषाचे कुटुंबाचा 'संरक्षक' असणे, ह्याबद्दल त्यांना कौतुक होते. इतिहासातील पुराणातील अनेक कथा त्यांच्या प्रतिवादासाठी त्या दोघांनाही वापरायच्या होत्या. पण आपण आणि आपल्या भवतालचा समाज मुळातूनच चूकिचाय हे मान्य करायचे नव्हते. त्या दोघांना बलात्कार घडला म्हणून लाजलज्जा शरम चीड संताप वाटण्यापेक्षा विदेशी माध्यमं आपल्या संस्कृतीला देशाला हिनवतात ह्याबद्दल अधिक तीव्र संताप होता. भारतीय संस्कृती म्हणून जे काही मिथक पसरवले गेले आहेत त्याचा हा एक खोलवर ब्रेनवॉशिंग झालेला परिणाम आहे.

भोतमांगेची प्रियांका ते रेड्डींची प्रियांका हा एवढाच सडलेला प्रवास नाही. तर त्याच्यामागे मोठं राजकीय आर्थिक जातीय धार्मिक पितृसत्ताक अधिष्ठान असणारा सोयीने रंगवलेला इतिहास आणि दाबलेलं वर्तमान आणि आंधळे भविष्य आहे. आपण त्या इतिहासावर वर्तमानावर आणि भविष्यावर सातत्याने बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे. ह्या भयंकर विकृतीच्या भवतालात स्त्रियांना शहाणपण आणि संरक्षण शिकवणे फार सोपे आहे, पण पुरुषांनी त्या प्रत्येक विकृतीबद्दल पुरुषप्रधान संस्कृतीचे फायदे उपटायचे म्हणून स्वतःच्या गप्प राहण्याला, डोकेझाक करण्याला, स्त्रीचे ऑब्जेक्टिफिकेशन करून जोक करण्याला तितकाच घृणास्पद मूळ अपराध मानायला हवं. एक पुरुष म्हणून आम्हाला आमचे आम्ही आमच्यासाठी आजवरचे पोसलेले सर्वच्या सर्व इगो गळून पडल्याशिवाय, आम्हाला आमची अंतर्बाह्य लाज वाटल्याशिवाय बदलाला सुरवात घडणे निवळ अशक्य आहे.

#JusticeForPriyanka

(पूर्वप्रकाशित : Facebook)